जळगाव । जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाला आहे.
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अनिल चौधरी यांनी आपल्या भूमिकेची घोषणा केली. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, नगरसेवक बबन पोकळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल चौधरी म्हणाले की, “माझ्या उमेदवारीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी मला फोन करून माघारीचा विचार करण्यास सांगितले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांनीही संपर्क साधून महायुतीच्या उमेदवारासाठी थांबण्याची विनंती केली. नंदकिशोर महाजन हे माझे जुने मित्र असल्याने त्यांच्या समर्थनार्थ मी हा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनीही या निर्णयामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, विदर्भातील राजकीय समन्वयाची जबाबदारी आमदार बच्चू कडू यांच्याकडे असून त्यांनी अनिल चौधरी यांच्याशी संपर्क साधला होता. महायुतीच्या नेतृत्वाच्या सूचनेनुसार आपण चौधरी यांची भेट घेत पाठिंब्याबाबत चर्चा केली. तसेच लवकरच अनिल चौधरी यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
अनिल चौधरी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचे पारडे अधिक जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.














Discussion about this post