नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आता लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेत फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन सुमारे २० मिनिटे चर्चा केली. यावेळी फुटीर खासदारांच्या स्वतंत्र गटाला संसदीय मान्यता देऊ नये आणि संविधानातील तरतुदींनुसार निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
संविधानानुसार कारवाईची मागणी
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी, “संविधानातील तरतुदींचे काटेकोर पालन झाले पाहिजे. फुटीर गटाला मान्यता देण्यापूर्वी कायदेशीर बाबींचा विचार करून संविधानाचा सन्मान राखला जावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
खासदार अनिल देसाई यांनी सांगितले की, “कोणत्याही गटाला मान्यता देण्यापूर्वी आमची बाजू ऐकावी, अशी विनंती लोकसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. कायद्यानुसार स्वतंत्र गटाला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये,” अशी मागणी त्यांनी केली.
कायदेशीर लढाईची तयारी
दरम्यान, या प्रकरणात पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार सुरू असून, फुटीर खासदारांविरोधात कारवाईसाठी वरिष्ठ कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केली आहे. यामुळे या राजकीय घडामोडींना आता कायदेशीर वळण मिळण्याची शक्यता असून, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय आणि पुढील घटनाक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post