पाचोरा । पाचोरा पोलिसांच्या तत्परता, धाडस आणि सतर्कतेमुळे पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएममधील लाखो रुपयांची रोकड चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव फसला आहे. पोलिसांनी वेळेत घटनास्थळी धाव घेतल्याने एटीएममधील तब्बल ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड सुरक्षित राहिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सुमारे ३.४५ वाजेच्या सुमारास जारगाव येथील सारोळा रोडवरील एसबीआयचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाचोरा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना धक्कादायक दृश्य दिसले. चोरट्यांनी एटीएममधील कॅश कॅबिनेट गॅस कटरने कापून बाहेर काढले होते आणि ते काळ्या रंगाच्या क्रेटा कार (MH 49 CS 7028) मध्ये ठेवण्याच्या तयारीत होते. घटनास्थळी तीन संशयित तरुण उपस्थित होते. मात्र, पोलिसांना पाहताच त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी कॅश कॅबिनेट तिथेच टाकून गाडीतून तारखेड्याच्या दिशेने पळ काढला.
धुळे जिल्ह्यापर्यंत पाठलाग
चोरट्यांना पकडण्यासाठी पाचोरा पोलिसांनी तातडीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग थेट धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत पोहोचला. जरी चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले असले, तरी पोलिसांनी तातडीने धुळे पोलीस नियंत्रण कक्ष, विविध टोल नाके तसेच मध्य प्रदेश पोलिसांना माहिती देत हाय अलर्ट जारी केला आहे. संशयितांच्या शोधासाठी नाकाबंदी करून व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपये वाचले
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एटीएममधील ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड चोरीला जाण्यापासून वाचली. जळगाव पोलिसांच्या या धाडसी आणि वेळीच केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून, पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.















Discussion about this post