अमळनेर । रेल्वे संरक्षण दलातील (आरपीएफ) जयपाल सिंह या सहाय्यक फौजदाराने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अमळनेर रेल्वेस्थानकातील आरपीएफ कार्यालयात घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर रेल्वेस्थानकावरील आरपीएफ कार्यालयात ड्युटीवर असताना एएसआय जयपाल सिंग यांनी त्यांच्या सेवाशस्त्रातून स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच सहकारी कर्मचारी आणि अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी जयपाल सिंग हे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले.
घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, त्यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक कारण, मानसिक तणाव किंवा अन्य काही कारणांमुळे हा प्रकार घडला का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चौकशी सुरू असून तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.














Discussion about this post