सोलापूर । सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर भाविकांची पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १४ जणांचा जागीच बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश असून, हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आनंदाने गावाकडे परतत असताना, तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याशेजारील विहिरीत जाऊन कोसळले. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली होती आणि तिला सुरक्षेसाठी कोणतेही कठडे नव्हते. यामुळे वाहन थेट तळाशी गेले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. विहिरीतून आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या संपूर्ण अपघातात २ जण सुदैवाने बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दोषींवर कठोर कारवाई होणार: पालकमंत्री जयकुमार गोरे
या भीषण अपघातावर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रस्त्याशेजारील विहिरीला कठडे का नव्हते आणि अपघात नक्की कसा झाला, याची सखोल चौकशी केली जाईल. यात कोणाचाही निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.














Discussion about this post