जळगाव/मुंबई । राज्यात जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी मान्सूनचा प्रवास थंडावल्याने संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण उकाडा आणि वाढत्या तापमानाचा सामना करत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज विदर्भातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर मान्सून अडकून पडल्याने मुंबईसह अनेक ठिकाणी नागरिक घामाघूम झाले आहेत. प्रशांत महासागरात खवळणाऱ्या ‘एल निनो’च्या (El Nino) प्रभावामुळे यंदा मान्सूनचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
मान्सूनचा प्रवास का थांबला?
नैऋत्य मोसमी वारे कोकणातील हर्णे-दापोली परिसरापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, पुढील वाटचालीसाठी वातावरणात आवश्यक असलेली अनुकूल स्थिती निर्माण न झाल्याने मान्सूनची प्रगती थांबली आहे. मुंबईत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने दमट हवामानामुळे नागरिक हैराण आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात (२० जूननंतर) मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेची लाट; कुठे कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट (विदर्भ): वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका असल्याने नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उष्ण व दमट हवामान: कोकण, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड तसेच विदर्भातील अकोला आणि अमरावती येथे दमट व त्रासदायक हवामान राहील.
येलो अलर्ट (वादळी पाऊस): पूर्व विदर्भासह राज्यातील काही निवडक भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याची चिंता वाढली
सर्वसाधारणपणे दरवर्षी १० जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल होऊन नियमित पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा हवामान विभागाने सुरुवातीला १२ जून, त्यानंतर १५ जून आणि आता थेट २० जूननंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात २० जूनपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पावसाची ही तारीख सातत्याने पुढे ढकलली जात असल्याने जिल्ह्यातील बळीराजा कमालीचा विवंचनेत सापडला आहे. धूळपेरण्या कराव्यात की पाऊस पडण्याची वाट पाहावी, या चिंतेने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. जळगावकरांना संतुलित आणि दमदार पावसासाठी आता २० जूननंतरचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शेतीवर ‘एल निनो’चे सावट
हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सक्रिय झाल्यामुळे देशातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील पावसाच्या वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते आणि मान्सूनचे आगमनही लांबू शकते. याचा थेट फटका शेतीकामांना आणि खरीप हंगामाच्या नियोजनाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.















Discussion about this post