जळगाव । जळगाव-पाळधी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून रोख रक्कम लुटणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात जळगाव तालुका पोलिसांना यश आले आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून अटक केलेल्यांमध्ये एका हिस्ट्रीशीटर आणि एका तडीपार गुन्हेगाराचा समावेश आहे.
चाकूचा धाक दाखवून ७ हजार ८०० रुपयांची लूट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. खोटे नगर, जळगाव) हे त्यांच्या मित्रांसह मोटारसायकलने जळगाव-पाळधी रस्त्यावरून जात होते. दरम्यान, हॉटेल साई गार्डन आणि हॉटेल राधिका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर चार जणांनी त्यांची मोटारसायकल अडवली. आरोपींनी थेट चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या खिशातील ७ हजार ८०० रुपये रोख हिसकावून घेतले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी मोटारसायकलची तोडफोड केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तातडीने शोध मोहिमेचे आदेश दिले. गुन्हे शोध (डीबी) पथकाला तपासासाठी रवाना करण्यात आले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने अवघ्या दोन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
त्यामध्ये चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१, रा. संत मिराबाई नगर, जळगाव), उमाकांत दत्तात्रेय जाधव (रा. संत मिराबाई नगर, जळगाव) — (तडीपार गुन्हेगार), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साईनगर, जळगाव) व रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर, जळगाव) या चौघांना अटक करण्यात आलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला चेतन उर्फ बटाटा सुशीर हा रेकॉर्डवरील अट्टल (हिस्ट्रीशीटर) गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी उमाकांत जाधव हा तडीपार गुन्हेगार असून त्याच्यावरही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.















Discussion about this post