मुंबई | राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली आलेला नाही. त्यामुळे राज्यात सध्या दुहेरी परिस्थिती पाहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दुसरीकडे, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर उष्ण व दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी हलक्या सरी किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसासोबत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
जळगावात अशी राहणार स्थिती?
एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असाल तरी जळगाव जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच आता तापमानासह हवेतील आर्द्रतेत (दमटपणा) कमालीची वाढ झाल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत जळगाव जिल्ह्याचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या तुलनेत तापमान थोडे कमी वाटत असले, तरी वातावरणातील आर्द्रता (दमटपणा) अत्यंत जास्त राहणार आहे. तापमान आणि आर्द्रता या दोन्हीच्या युतीमुळे जळगावकरांना केवळ उष्णतेचे चटकेच बसणार नाहीत, तर अंगातून घामाच्या धारा वाहून जीव नकोसा होणार आहे.















Discussion about this post