केंद्र सरकारमध्ये प्रतिष्ठेची नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत एसएससी सीजीएल परीक्षा २०२६ अंतर्गत आयकर निरीक्षक (Income Tax Inspector) पदासह विविध केंद्रीय विभागांतील गट ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आकर्षक वेतन, शासकीय सुविधा आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी असल्याने या भरतीकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
आयकर निरीक्षकाची काय असते जबाबदारी?
आयकर निरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर करचुकवेगिरीशी संबंधित प्रकरणांची चौकशी, आर्थिक कागदपत्रांची तपासणी, छापेमारी आणि विभागीय प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडावी लागते. देशाच्या महसूल व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारे हे पद अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्जदाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड एसएससी सीजीएल परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. सर्वप्रथम टियर-१ परीक्षा होईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना टियर-२ परीक्षेला सामोरे जावे लागेल. दोन्ही टप्प्यांतील गुणवत्तेनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम नियुक्ती दिली जाईल.
आकर्षक वेतन आणि शासकीय सुविधा
आयकर निरीक्षक पदासाठी पे लेव्हल-८ अंतर्गत वेतन दिले जाते. या पदावर सुरुवातीला सुमारे ४७,६०० रुपये मूलभूत वेतन मिळते. याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) तसेच इतर शासकीय सुविधा आणि भत्त्यांचाही लाभ कर्मचाऱ्यांना मिळतो.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) पूर्ण करावे. त्यानंतर SSC CGL 2026 अर्ज लिंकवर जाऊन आवश्यक माहिती भरून कागदपत्रे आणि छायाचित्र अपलोड करावे. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून अंतिम सबमिट करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत सुरक्षित ठेवावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जून आहेत
केंद्र सरकारच्या सेवेत अधिकारी म्हणून करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post