मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गोटातून अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना पूर्णविराम देत, राष्ट्रवादीने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अखेर भंडाऱ्याचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या मॅरेथॉन बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, समीर भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत राज्यसभेच्या तिकिटासाठी अनेक नावांवर खल झाला.
या बैठकी छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात यावी, असं आग्रह घेतला होता. दुसरीकडे राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाबरोबरच बीडचे अमरसिंह पंडित, भंडाराचे राजेंद्र जैन यांच्या नावाचीही बैठकीत चर्चा झाली. छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते आग्रही होते. परंतु समीर भुजबळ यांना मंत्री करण्यास भाजप श्रेष्ठींकडून नकार आल्याची माहिती आहे. परंतु छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना मंत्री केले, तरच राज्यसभेवर जाणार असल्याची अट घातल्याने तिढा वाढला. पुढे बराच वेळ चर्चा झाल्यानंतर भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांचे नाव निश्चित केले.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना राजेंद्र जैन यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली. राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर छगन भुजबळ माध्यमांशी न बोलता निघून गेले. त्यांच्यासोबत समीर भुजबळ देखील तात्काळ देवगिरी बंगल्यावरून निघाले. त्याचबरोबर या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु अंतिम क्षणी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली.















Discussion about this post