जळगाव | जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलिसांनी ५ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथके आणि वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई केली. विविध ठिकाणी नाकाबंदी करून संशयित व्यक्ती, वाहने तसेच गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
मोहीमेदरम्यान दारूबंदी कायद्यांतर्गत १९६ गुन्हे दाखल करून २१ लाख ६५ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाराच्या ७६ प्रकरणांमध्ये कारवाई करत ४६ हजार रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत १ हजार ४४३ वाहनचालकांकडून ९ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ५६ जणांवरही कारवाई करण्यात आली.
विशेष मोहिमेत २०८ हॉटेल व लॉजची तपासणी, ४२ अटक वॉरंट आणि ५२ जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी, ६ अवैध वाळू वाहतूक प्रकरणांवर कारवाई, तसेच १० अमली पदार्थविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले. याशिवाय ३४ बेपत्ता व्यक्तींचा शोध, २०३ COTPA प्रकरणांमध्ये कारवाई आणि फरार तसेच तडीपार आरोपींवरही धडक कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेनेही या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावत दारूबंदी, जुगार, अवैध शस्त्र आणि प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळवले.
जिल्हा पोलिसांनी भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले असून, नागरिकांनी संशयास्पद हालचाली अथवा व्यक्तींची माहिती तातडीने पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post