मुंबई । आकर्षक आणि भ्रामक जाहिरातींना बळी पडून सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने एक अत्यंत मोठा आणि कडक इशारा दिला आहे. डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आता विभाग फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सर्जिकल स्ट्राईक करणार आहे. विशेष म्हणजे, यापुढे केवळ उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्याच नाही, तर त्या उत्पादनांची जाहिरात करणारे बडे सेलिब्रिटी आणि कलाकारही कारवाईच्या कचाट्यात येणार आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या देखरेखीखाली सर्व जाहिरातींची सखोल तपासणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. कायद्याच्या तरतुदीनुसार ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत फसव्या जाहिरातींवर कारवाई करता येते. तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार फसवणूक सिद्ध झाल्यास दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.आता केवळ कंपन्याच नाही तर जाहिरात करणारे सेलिब्रिटीही जबाबदारीच्या कक्षेत येणार असून, ग्राहकांच्या हितासाठी सरकारकडून मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
कायदा काय सांगतो?
फसव्या जाहिरातींबाबत भारतात ग्राहक संरक्षण कायदा, भारतीय दंड संहिता, अन्न व औषध कायदे यावर आधारित कठोर नियम आहेत. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार कोणतीही जाहिरात खोटी, गोंधळात टाकणारी किंवा फसवणूक करणारी असल्यास त्यावर कारवाई होऊ शकते.
तसेच ग्राहकाला झालेल्या नुकसानीची भरपाई मागता येते. भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत खोटी जाहिरात करून लोकांना फसवणे हे धोखाधडी किंवा गंभीर फसवणूक मानले जाते.अन्न संबंधित उत्पादनांबाबत फसव्या दावा करणाऱ्या जाहिरातींवर अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, तर औषधांबाबत ड्रग्स व औषध कायदा कठोर शिक्षा लागू करतो.जर सेलिब्रिटीने उत्पादनाची जाहिरात करताना खोटा दावा केला, तर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, तसेच नुकसान भरपाईची मागणी करता येऊ शकते. दंड, आर्थिक दंड, तुरुंग किंवा जाहिरात बंद करणे व उत्पादन मागे घेणे (recall) यासारख्या शिक्षा लागू होऊ शकतात.















Discussion about this post