जळगाव/मुंबई । गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना अखेर उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात मान्सूनपूर्व हवामान सक्रिय झाले असून, पुढील काही दिवस जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे, मान्सून आता केरळच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून पुढील ४८ तासांत तो दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांत ‘येलो अलर्ट’ जारी केला असून शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी वादळी पाऊस आणि तुरळक गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील इतर अनेक भागांतही मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा यंदाचा मुहूर्त काहीसा लांबला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात ढग दाटून आले असून मान्सून केरळच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून केरळ तसेच तमिळनाडूच्या दक्षिणेकडील काही भागांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात पुढील ४ दिवस वादळी पाऊस
जळगाव जिल्ह्यासाठी पुढील ४ दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आजपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्यस्थितीतील हवामान हे संवाहनीय पावसासाठी (Convective Rain) अत्यंत पोषक बनले असल्याने, जळगाव जिल्ह्यातील काही भागांत गारपीट देखील होऊ शकते.















Discussion about this post