अमळनेर । अमळनेर तालुक्यातील धावडा शिवारात तापी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करत वाळू माफियांचे मोठे रॅकेट उघड केले आहे. या कारवाईदरम्यान तब्बल १० पोकलेन मशीन, १० डंपर, ६ बोटी आणि मोठ्या प्रमाणावर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी डिझेल टंचाईने त्रस्त असताना वाळू माफियांकडे बॅरलच्या बॅरल डिझेल सापडल्याने संताप व्यक्त होत आहे.
सावखेडा परिसरात अधिकृत वाळू उत्खननाला मर्यादित परवानगी असताना धावडा शिवारातून मात्र मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल, पोलीस आणि संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकत संपूर्ण परिसर सील केला. नदीपात्रातून बोटींच्या सहाय्याने वाळू काढून ती अवाढव्य डंपरमधून वाहतूक केली जात असल्याचे तपासात उघड झाले.
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून १० ते १२ बॅरल डिझेल जप्त करण्यात आले. एकीकडे शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी कॅनमध्ये डिझेल मिळत नसताना दुसरीकडे वाळू माफियांना मोठ्या प्रमाणावर डिझेलचा पुरवठा कसा झाला, यावरून काळाबाजाराचे मोठे जाळे सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित सर्व वाहनांचे आरटीओ परवाने निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पेट्रोलियम कायद्यांतर्गतही संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायाविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, यामुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.















Discussion about this post