धरणगाव । पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांच्या आणि निष्पाप मुलांच्या जिवाशी खेळणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे रिफाइंड पामोलिन तेलाचा आणि रसायनांचा वापर करून हुबेहूब दिसणारे ‘कृत्रिम दूध’ (बनावट दूध) तयार करणाऱ्या रॅकेटचा अन्न सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून टाकला छापा
भवरखेडा येथील संशयित आरोपी सोमनाथ माळी हा गेल्या काही दिवसांपासून दूध भेसळीचा काळा धंदा करत असल्याची गोपनीय माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली. यावेळी तिथे सुरू असलेला प्रकार पाहून अधिकारीही चक्रावून गेले.
तपासादरम्यान समोर आले की, आरोपी सोमनाथ माळी हा रिफाइंड पामोलिन तेलावर रासायनिक प्रक्रिया करून कृत्रिम दूध तयार करत होता. हे बनावट दूध तो मूळ (अस्सल) दुधात मिसळायचा, ज्यामुळे दुधाचे प्रमाण तर वाढायचेच, शिवाय त्यातील ‘फॅट’चे प्रमाणही कृत्रिमरित्या वाढवले जायचे. दूध अधिक घट्ट आणि दर्जेदार असल्याचा भास निर्माण करून ते डेअरी आणि सर्वसामान्य ग्राहकांना विकले जात होते.
हे भेसळयुक्त दूध केवळ भवरखेडा गावापुरते मर्यादित नव्हते, तर डेअरीच्या माध्यमातून ते परिसरातील हजारो ग्राहकांच्या घराघरांपर्यंत पोहोचत होते. कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने आणि पामोलिन तेल मानवी शरीरासाठी, विशेषतः लहान मुलांसाठी अत्यंत घातक असून यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा अन्न सुरक्षा विभागाने केला आहे.
‘या’ कलमांनुसार गुन्हे दाखल
धाडीदरम्यान बनावट दूध आणि ते तयार करण्यासाठी लागणारे रासायनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ माळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीवर अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत कलम २६(१), २७(३), ५९ आणि ६४, तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २७४, २७५, १२३ आणि ३१८ अन्वये कडक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.















Discussion about this post