जळगाव । अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय बाजारासह सराफा बाजारावरही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण झाली असून ग्राहकांसाठी काहीसा दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर १ लाख ५५ हजार रुपयांवर आले असून जीएसटीसह हा दर सुमारे १ लाख ६१ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून चांदी तब्बल १० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदीचा दर २ लाख ६५ हजार रुपये प्रति किलो असून जीएसटीसह तो सुमारे २ लाख ७० हजार रुपयांवर स्थिरावला आहे.
सराफा व्यावसायिकांच्या मते, अमेरिका-इराण यांच्यातील वाढता तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता तसेच डॉलरच्या मूल्यात होणारे बदल याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरावर होत आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला होता. मात्र आता नफा वसुली आणि जागतिक घडामोडींमुळे दरात घसरण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आगामी काही दिवसांत मध्य-पूर्वेतील परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींवर सोन्या-चांदीचे दर अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.















Discussion about this post