जळगाव । जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच शिवसेना आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जळगावची जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी ठाम मागणी केली आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील आणि अमोल पाटील यांनी सहभाग घेतला. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव आणि कार्यकर्त्यांचे संघटन लक्षात घेता उमेदवारी शिवसेनेकडेच ठेवावी, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते.
दुसरीकडे भाजपकडूनही या जागेसाठी रणनीती आखण्यात येत असून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. महिला नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने भाजप त्यांच्यावर दाव लावू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे महायुतीत या जागेवरून अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. शिंदे गटाला किती जागा दिल्या जाणार, यावरच जळगाव मतदारसंघाचे समीकरण अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत होणाऱ्या बैठकींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निरीक्षक भास्करराव काळे यांच्या उपस्थितीत उद्या २८ मे रोजी मित्रपक्षांची बैठक होणार असून त्यानंतर विरोधकांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र २७ इच्छुकांनी तब्बल ४० अर्ज घेतल्याने इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून ४ जूनपर्यंत उमेदवारी माघारी घेता येणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास २२ जून रोजी मतदान होणार आहे.
जळगावच्या विधान परिषद जागेवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे आगामी काही दिवस जिल्ह्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.















Discussion about this post