नाशिक । सध्या कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्यातच वाढता कर्जबाजारीपणा, निसर्गाचे बदलत चाललेले हवामान आणि पिकवलेल्या शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव… याच विवंचनेत अडकलेल्या एका शेतकऱ्याने अखेर टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहुड येथे घडली. गुलाब केशव निकम (वय ५९, रा. राहुड) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या या आकस्मिक निधनाने राहुडसह संपूर्ण काटवन परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब निकम हे आपली तीन एकर शेती कसत पत्नी व तीन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेती हाच त्यांच्या संसाराचा मुख्य आधार होता. मात्र, गेल्या काही काळापासून घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर त्यांच्यावर वाढत चालला होता. त्यातच बदलत्या हवामानामुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले. यंदाच्या हंगामात त्यांनी मोठ्या आशेने कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसाने घात केला आणि मोठा कांदा शेतातच सडून खराब झाला. जो काही थोडाफार कांदा वाचला, त्याला बाजारात विकायला नेले असता मातीमोल भाव मिळाला. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी अधिकच बिकट झाली होती.
नातेवाईकांकडून घेतलेले हातउसने पैसे कसे परत करायचे, रोजचा घरखर्च कसा चालवायचा आणि तीन मुलांचे विवाह कसे पार पाडायचे, या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. वाढत्या कर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दररोजच्या नियमाप्रमाणे गुलाब निकम हे जनावरांना चारा टाकण्यासाठी गावाशेजारील खळ्यात गेले होते. रविवारी रात्री ते शेतातच मुक्कामी थांबले. मात्र, आज सोमवारी सकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांचा मुलगा चेतन निकम हा शोध घेण्यासाठी खळ्याकडे गेला. तेथे वडिलांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
त्याच्या आरडाओरडीमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, राहुड गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.















Discussion about this post