मुंबई । राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी आजपासून (२५ मे) उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी घटक पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच, चर्चा आणि रुसवेफुगवे पाहायला मिळाले. मात्र, अखेर दीर्घ खलबतांनंतर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
१७ जागांच्या या निवडणुकीत महायुतीमधील जागांचे गणित अखेर स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जागावाटपात सर्वाधिक भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) ०४ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ०१ जागा मिळाली आहे.
शिवसेनेची ७ जागांची मागणी; ४ जागांवर समाधान?
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) ७ जागांसाठी ठाम होती. “लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात,” अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र, प्रदीर्घ चर्चेनंतर शिवसेनेच्या वाट्याला ४ जागा आल्याचे समजते.या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही एक जागा मिळाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, भाजपने नेहमीप्रमाणे आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पुणे मतदारसंघावरील आपला दावा ठामपणे कायम ठेवला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंतिम शिक्कामोर्तब होणार
महायुतीतील या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज किंवा उद्या एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या अंतिम बैठकीनंतर तिन्ही प्रमुख नेत्यांकडून जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाईल.















Discussion about this post