चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या १३ महिलांच्या घोळक्यावर वाघाने अचानक भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात ४ महिलांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर इतर महिलांनी पळ काढल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या हंगामात रोजगारासाठी ग्रामीण भागातील नागरिक जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात. सुरक्षेचा उपाय म्हणून गुंजेवाही परिसरातील १३ महिला एकत्र घोळका करून जंगलात गेल्या होत्या. मात्र, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक या महिलांवर आक्रमकपणे झडप घातली. वाघाचा हल्ला होताच घाबरलेल्या महिला जिवाच्या आकांताने ओरडत सैरावैरा पळू लागल्या. जंगलात तातडीने कोणतीही मदत मिळणे कठीण असल्याने, वाघाने महिलांना बचावाची कोणतीही संधी न देता सलग हल्ले केले आणि ४ महिलांना जागीच ठार केले.
कवडूबाई दादाजी मोहुर्ले, अनुबाई दादाजी मोहुर्ले, सुनिता कौशिक मोहुर्ले आणि संगीता संतोष चौधरी अशी मृत पावलेल्या महिलांची नावं आहेत.या घटनेबद्दलची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभाग याचा तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाचे अधिकारी वाघाचा शोध घेतल आहे.















Discussion about this post