मुंबई । देशांतर्गत बाजारात आज सकाळी इंधन दरात वाढ झाल्याने महागाई वाढण्याची चिंता व्यक्त होत असतानाच, सराफ बाजारातून मात्र एक अत्यंत धक्कादायक आणि ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच आयात शुल्कात (कस्टम ड्युटी) वाढ केल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र, आज (शुक्रवारी) सकाळी सोन्या-चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे ३ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १७ हजार रुपयांची मोठी कपात नोंदवली गेली आहे.
यानंतर सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹२,९२० ने घसरून ₹१,५९,१६० इतका झाला. तर चांदी प्रति किलो १७५९० रूपयांनी स्वस्त होऊन ₹२,७३,१४० वर आली आहे. लग्नसराईत सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साह आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करणं टाळा, असे आवाहन केल्याने विक्रीत ५० टक्क्यांची घट आल्याचे तज्ज्ञांकडून सांघण्यात आले.
का कोसळले सोने-चांदीचे दर?
तज्ज्ञांच्या मते, या घसरणीमागे प्रामुख्याने जागतिक घडामोडी कारणीभूत आहेत. आखाती देशांमधील भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. याशिवाय, जागतिक स्तरावर वाढती महागाई आणि आगामी काळात होणारी व्याजदरवाढ या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील आपला पैसा काढून इतरत्र वळवला आहे. परिणामी, दोन दिवस विक्रमी पातळीवर असलेल्या दरांमध्ये आज मोठी घसरण झाली.















Discussion about this post