मुंबई । राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पक्षाची साथ सोडत आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विधानपरिषदेवर आमदारकीची संधी न मिळाल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते, याच नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज राजीनामा दिला. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश समन्वय ठाणे आणि पालघर जिल्हा अशा सर्वच पदांचा राजीनामा दिला. विधानपरिषदेवर आमदारकी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती.
आनंद परांजपे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडल्यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी राजीनामा दिल्याचे पत्र देखील शेअर केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले की, ‘मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे.’
गेल्या काही दिवसांपूर्वीच आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री यांची नंदनवन येथे घेतली होती. या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. ते शिंदेगटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीमधील दोन गट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक म्हणून आनंद परांजपे यांची ओळख होती. मात्र राष्ट्रवादीमधून आव्हाडांना सोडचिट्टी देत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.














Discussion about this post