पुणे । महाराष्ट्रात गुन्हेगारी काही कमी होण्याचं नाव घेत नसून अशातच आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास ‘युवराज रेस्टॉरंट अँड बार’ येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींची ओळख पटवण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, अनिल मोरे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आरपीआय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
अनिल मोरे हे आरपीआय (आठवले गट) मध्ये सक्रिय पदाधिकारी होते आणि कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती. त्यांच्या हत्येची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
प्राथमिक तपासात ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.















Discussion about this post