जळगाव । जळगाव सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरांनी मोठी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येत असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यानंतर मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
आज जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांची वाढ झाली, तर चांदी तब्बल १० हजार रुपयांनी महागली. त्यामुळे सोन्याचा दर १ लाख ५६ हजार रुपयांपर्यंत पोहोचला असून चांदीचे दर २ लाख ७९ हजार रुपये प्रति किलोपर्यंत गेले आहेत.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, जीएसटीपूर्वी सोन्याचा दर सुमारे १ लाख ५१ हजार ५०० रुपये होता. मात्र करासह तो १ लाख ५६ हजारांच्या पुढे गेला आहे. त्याचप्रमाणे चांदीचे दरही जीएसटीसह २ लाख ७९ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ऐन लग्नसराईच्या काळात दागिन्यांच्या दुकानांमध्ये अपेक्षित गर्दी नसल्याने सराफ व्यावसायिकांचे टेन्शन वाढले आहे.
वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहक खरेदीपासून दूर राहत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दागिने विक्री कमी झाली असून कारागिरांचे वेतन, दुकानांचा खर्च आणि रोजचे व्यवहार कसे सांभाळायचे, असा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.















Discussion about this post