जळगाव । जळगाव तालुक्यातील वडनगरी परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. मजुरीसाठी शेतात जात असताना गिरणा नदीच्या पात्रात बैलगाडी उलटल्याने ५५ वर्षीय शेतमजुराचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका बैलाचाही मृत्यू झाला असून दुसरा बैल बचावला आहे.
मृत शेतमजुराचे नाव दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५, रा. वडनगरी) असे आहे. ते सहकारी चिंतामण नाईक यांच्यासोबत रोजप्रमाणे खेडी भोकर शिवारातील शेतात मजुरीसाठी जात होते. सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची बैलगाडी गिरणा नदीच्या पात्रातून जात असताना खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने अचानक गाडी पाण्यात उलटली.
घटना घडताच चिंतामण नाईक यांनी प्रसंगावधान राखून गाडीतून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. मात्र, दिलीप कल्याणकर यांना बाहेर पडता आले नाही. बैलगाडीसह ते खोल पाण्यात बुडाले.घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांसह स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कल्याणकर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
या दुर्घटनेत बैलगाडीला जुंपलेल्या दोन बैलांपैकी एक बैल वाचला, तर दुसऱ्या बैलाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वडनगरी आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मृत दिलीप कल्याणकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. दरम्यान, या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post