जळगाव । “वर्षभर सोने खरेदी करू नका,” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जाहीर आवाहनाचा थेट परिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला. सोमवारी सकाळी बाजार उघडताच महाराष्ट्राची सुवर्णनगरी असलेल्या जळगावात सोन्याच्या दरात प्रतितोळा तब्बल ८०० रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली, तर चांदीच्या दरातही प्रति किलो १ हजार रुपयांची कपात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या चांदीत मोठी घसरण झाली पंतप्रधानांच्या घोषणेनंतर भविष्यात सोन्याची स्थिती कशी राहील, याकडे ग्राहकांचं लक्ष लागलेय. जळगावच्या सुवर्णनगरीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख ५० हजार रूपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ३७ हजार ४०० रूपये इतके झाले आहेत. तर चांदीची किंमत प्रति किलो २ लाख ५९ हजार इतक्या रूपयांवर आली आहे. भविष्यात सोन्याची किंमत वाढणार की घसऱणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि गगनाला भिडलेले सोन्याचे दर यामुळे आधीच ग्राहक सोन्याकडे पाठ फिरवत होते. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याने सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र लग्नसराई आणि जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू आहे, तरीही दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी नाहीये. मोदींच्या या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, याचा थेट फटका सराफ व्यावसायिकांना बसला आहे. आधीच नोटबंदी आणि लॉकडाऊनचा मोठा तोटा सहन केलेल्या या व्यावसायिकांसमोर आता बँकेचे कर्ज आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे, हे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यावर सरकारने काहीतरी विचार करावा, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.















Discussion about this post