जळगाव: शहरातील शैक्षणिक हब मानल्या जाणाऱ्या एम.जे. कॉलेज परिसरातील अवैध सायबर कॅफेंवर रामानंदनगर पोलिसांनी शनिवारी दुपारी धडक कारवाई केली. तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी खाजगी जागा (केबिन) उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेंवर छापा टाकत पोलिसांनी मालक आणि चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
एम.जे. कॉलेज परिसरातील काही सायबर कॅफेंमध्ये अल्पवयीन मुले-मुली तसेच तरुण जोडप्यांना अश्लील चाळे करण्यासाठी ‘स्पेशल केबिन’च्या नावाखाली जागा दिली जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही मोहीम राबवली.
माहितीची खात्री पटल्यानंतर नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस आणि पोलिसांच्या ‘दामिनी पथकाने’ संयुक्तपणे या कॅफेंवर अचानक धाडी टाकल्या. यावेळी कॅफेंमध्ये नियमांचे उल्लंघन करून तयार करण्यात आलेल्या संशयास्पद केबिन आढळून आल्या. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कॅफे चालकांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन कॅफे मालक आणि चालकांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. शैक्षणिक परिसरात अशा प्रकारचे अवैध कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.















Discussion about this post