राज्यात सध्या हवामानाचे दुहेरी चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोकण किनारपट्टीवर कडक ऊन आणि असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज (९ मे) विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आज (ता. ९) विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार वादळी पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला दिसून आला. वाशीम आणि जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर ब्रह्मपुरी, मालेगाव आणि भंडारा येथे तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले. सोलापूर, धाराशिव, परभणी, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांतही ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र अनेक शहरांमध्ये दिसून आले. दरम्यान, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.















Discussion about this post