राजस्थानमधील ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत झालेल्या ९०० कोटींहून अधिक रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने आज पहाटे मोठी कारवाई केली. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेश जोशी यांना एसीबीच्या विशेष तपास पथकाने (SIT) पहाटे जयपूर रेल्वे स्टेशनजवळील सन कॉलनीतील निवासस्थानी छापा टाकला आणि चौकशीनंतर पहाटे ५:०० च्या सुमारास त्यांना अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली .
प्रकरण काय आहे?
हे प्रकरण प्रत्येक घराला नळाचे पाणी पुरवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत जारी केलेल्या निविदांमधील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. जोशी आणि इतरांवर एका मर्जीतील कंपनीला निविदा मिळवून देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप आहे.
श्री गणपती ट्यूबवेल आणि श्री श्याम ट्यूबवेल नावाच्या कंपन्यांनी आयआरसीओएन इंटरनॅशनलने कथितरित्या जारी केलेली बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करून या निविदा मिळवल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये श्री गणपती ट्यूबवेलने फसवणूक करून ८५९.२ कोटी रुपयांचे कंत्राट आणि श्याम ट्यूबवेलने १२०.२५ कोटी रुपयांची निविदा मिळवली आहे.
२२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल
माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध अग्रवाल यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे, तर एसीबीने २०२४ मध्ये आर्थिक सल्लागार, मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्यासह २२ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.
आरोपींच्या यादीत जेजेएमचे आर्थिक सल्लागार सुनील शर्मा, तत्कालीन मुख्य अभियंता राम करण मीना, दिनेश गोयल, अतिरिक्त मुख्य अभियंता अरुण श्रीवास्तव, रमेश चंद मीना, परितोष गुप्ता, अधीक्षक अभियंता निरेल कुमार, विकास गुप्ता, महेंद्र प्रकाश सोनी, भगवान सहाय जाजू, जितेंद्र शर्मा आणि कार्यकारी अभियंता विशाल सक्सेना यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
सध्या, तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. एसीबीने त्यांच्या मालमत्तेची माहिती गोळा करून ती न्यायालयासमोर सादर केली आहे. आता त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाईल.















Discussion about this post