जळगाव : शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ११ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क येथील ‘रुबी पेंट्स’ कंपनीचे मालक मोईज बोहरा यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी मध्य प्रदेशातील सेंधवा व खरगोन परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक आरोपींमध्ये निलेश उर्फ भुऱ्या डुडवे, ताराचंद सोलंकी, सायसिंग सोलंकी, रविंद्र आर्य, दिलीप डुडवे आणि यारशीरालाल अलावे यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११,०५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.















Discussion about this post