यावल । यावल शहरातील छत्रपती शिवाजी नगर भागात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. मित्रांसोबत घराबाहेर क्रिकेट खेळत असताना एका १० वर्षीय बालकाच्या अंगावर अचानक स्लॅब कोसळला. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रणवीर जगदीश गायकवाड (वय १०) असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण यावल शहरात आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
रणवीर हा आपल्या घराबाहेर इतर मुलांसोबत आनंदाने क्रिकेट खेळत होता. खेळ रंगात आलेला असतानाच, अचानक शेजारी असलेल्या एका जुन्या आणि जीर्ण झालेल्या घराच्या समोरील पोर्चचा स्लॅब मोठा आवाज होऊन कोसळला. दुर्दैवाने रणवीर या स्लॅबखाली दाबला गेला आणि गंभीर जखमी झाला.हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या रणवीरला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
रणवीरच्या निधनानंतर त्याचा मृतदेह रविवारी रात्रीच यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे डॉ. गौरव भोईटे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र पवार पुढील तपास करत आहेत.















Discussion about this post