तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये आजवरचा सर्वात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टालिन यांना त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. गेल्या तीन टर्मपासून सलग निवडून येणाऱ्या स्टालिन यांचा त्यांच्याच जुन्या सहकाऱ्याने, म्हणजेच टीव्हीके (TVK) पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी दारूण पराभव केला आहे.
या निकालामुळे तामिळनाडूच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून, सत्ताधारी द्रमुकसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या अत्यंत चुरशीच्या लढतीत व्ही. एस. बाबू यांना ६४ हजारांहून अधिक मते मिळाली, तर मुख्यमंत्री स्टॅलिन हे जवळपास साडेसात हजार मतांच्या फरकाने मागे राहिले. तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात एखाद्या सत्ताधारी मुख्यमंत्र्याला एका नवख्या पक्षाच्या उमेदवाराने पराभूत करण्याची ही पहिलीच मोठी घटना मानली जात आहे.
सुपरस्टार विजय याने राजकारणात प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. निवडणूक आयोगाच्या दुपारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल १०७ जागांवर आघाडीवर आहेत, तर ५५ जागांवर ते दुसऱ्या स्थानावर आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ या जादूई आकड्याच्या दिशेने विजय यांचा पक्ष वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. काही जागांवर ही लढत अत्यंत अटीतटीची असून कुंभकोणम, शोलावंदन आणि विक्रवंडी या मतदारसंघांत टीव्हीके उमेदवार अवघ्या १०० ते १५० मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत.















Discussion about this post