बुलढाणा । विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बुलढाणा जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे. अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने, त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तब्बल ९० हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपले सामूहिक राजीनामे सादर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील बुलढाणा दौऱ्यावर होते. त्यांनी सायंकाळी जिल्ह्यातील पक्ष संघटन आणि आगामी रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वीच संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन राजीनाम्यांचे पत्र सोपवले. या अनपेक्षित प्रकारामुळे पालकमंत्र्यांना नियोजित बैठक रद्द करावी लागली आहे.
उमेदवारी नाकारल्याने संतापाची लाट
ॲड. नाझेर काझी हे पक्षाचे निष्ठावान नेते आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने यावेळी त्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये ही भावना निर्माण झाली आहे की, निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही.
आजही बुलढाणा जिल्ह्यातील आणखी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.















Discussion about this post