मुंबई: “जर तुम्हाला प्रवाशांनी बोललेलं मराठी समजत नसेल किंवा तुम्हाला मराठीत संवाद साधता येत नसेल, तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा कोणताही अधिकार नाही,” अशा स्पष्ट आणि कडक शब्दांत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा दिला आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात १ मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी सक्ती’चा निर्णय लागू होणार होता. मात्र, सरकारने आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याचे संकेत दिले आहेत.
येत्या १ मे ते १५ ऑगस्ट या काळात परिवहन विभागामार्फत एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या १०० दिवसांच्या कालावधीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी जुजबी मराठी शिकणे आवश्यक आहे. या काळात सरकार थेट कठोर कारवाई करणार नाही, मात्र ही मोहीम सातत्याने सुरू राहील.
प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, राज्याच्या परिवहन नियमावलीत मराठी भाषेच्या वापराबाबत आधीच तरतूद आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मीरा भाईंदरमधील ५६२ रिक्षा चालकांना नोटीस बजावण्याची घोषणा त्यांनी केली आहे.”कोणी कितीही आंदोलने केली किंवा बंद पुकारला तरी आमची भूमिका बदलणार नाही. महाराष्ट्रात राहायचे असेल तर इथल्या भाषेचा आदर करावाच लागेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.















Discussion about this post