जळगाव: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. जळगाव विधान परिषदेची जागा कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले असताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना (शिंदे गट) शंभर टक्के दावा करणार,” अशी स्पष्ट भूमिका मंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडली आहे. या विधानामुळे महायुतीमधील जागावाटपावरून नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जळगाव विधान परिषदेची जागा पूर्वी शिवसेनेकडे होती आणि त्या जागेवर दोन वेळा शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. मात्र मागील दोन कार्यकाळांपासून ही जागा भाजपकडे राहिली आहे. जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ जवळपास समान असल्याने या वेळी जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर ठाम भूमिका मांडणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यात विधान परिषदेच्या जागांची अदलाबदल करण्याचा अधिकार वरिष्ठ नेतृत्वाकडे असला तरी निवडणुकीत जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक गणित लक्षात घेऊन जळगावची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी आपण भाजप नेतृत्वासह एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत जागावाटपावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.















Discussion about this post