भुसावळ । भुसावळ नगरपरिषदेमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचा अनुसूचित जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. या निर्णयामुळे भंगाळे यांचे नगराध्यक्षपद आता धोक्यात आले असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना?
भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने गायत्री भंगाळे यांनी भाजपच्या उमेदवार आणि मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला होता. निवडणुकीच्या वेळी भंगाळे यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांनी जारी केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते.
पडताळणी समितीचा मोठा निर्णय
नियमानुसार, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र (Validity) सादर करणे बंधनकारक असते. मात्र, ही मुदत संपण्यापूर्वीच पडताळणी समितीने आपला निकाल दिला आहे. गायत्री भंगाळे या अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याचे स्पष्ट झाले. या आधारे त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. रजनी संजय सावकारे, प्रमोद सावकारे, संजय तायडे आणि राहुल तायडे यांनी या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या सखोल चौकशीनंतर समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
हे प्रकरण केवळ नगराध्यक्षांच्या पदापुरते मर्यादित राहिलेले नाही. संबंधित चुकीचे प्रमाणपत्र जारी केल्याप्रकरणी तत्कालीन भुसावळ प्रांताधिकाऱ्यांवरही कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.















Discussion about this post