बुलडाणा : जिल्ह्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून एकाच कुटुंबातील तीन लहानग्या बहीण-भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत आई आणि एका चिमुकलीची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाड परिसरातील एका कुटुंबातील आईसह चार मुलांना रविवारीपासून पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. सोमवारी सकाळी प्रकृती अधिक खालावल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४ वर्षे), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय ७ वर्षे) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८ वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला.
तर अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४ वर्षे) आणि अश्मिरा वसीम जमदार (वय ३ वर्षे) यांच्यावर बुलडाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमागे अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.















Discussion about this post