बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा बारामतीत पार पडला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाल्या. “दोन महिन्यांपूर्वी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाहीत, हे अजूनही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत पोटनिवडणूक होईल. दादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला. बारामतीकरांकडे पाहूनच मला धीर आला,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, बारामतीच्या प्रत्येक ठिकाणी अजितदादांचा स्पर्श आहे आणि या मतदारसंघाची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. “अजितदादांनी मताधिक्याचे विक्रम केले. ही निवडणूक नसून त्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी आहे. बारामती त्यांच्यासाठी आईसारखी होती,” असे सांगत त्यांनी विकासाचा वेग कायम ठेवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी बारामतीकरांना कधीही वाऱ्यावर सोडणार नसल्याचा शब्द दिला. “ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे. तुम्ही आजवर अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही जास्त साथ मला द्याल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच, “मी अजितदादांचा विचारांचा वारसा पुढे नेईन. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार साहेबांची सून आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळण्याची ताकद मिळेल,” असे वक्तव्यही सुनेत्रा पवार यांनी केले.















Discussion about this post