मुंबई । बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून पाठिंब्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे पाठिंब्याची मागणी केली असून, लवकरच काँग्रेस नेत्यांशीही संपर्क साधण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेस ने बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवार देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या असून, पक्षाच्या हायकमांडकडून हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होणार असून, 6 एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदही समोर येत असल्याच्या चर्चा आहेत. सुनेत्रा पवार या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षातील कोणते वरिष्ठ नेते त्यांच्या सोबत दिसणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post