तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. विरुधुनगरचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिकम टागोर यांनी पक्षाच्या तामिळनाडू निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील जागावाटपावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसने सत्ताधारी डीएमकेसोबत युती करून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या युतीमध्ये काँग्रेसला केवळ २८ जागा देण्यात आल्याने पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या विद्यमान १८ जागांपैकी दोन जागा डीएमकेकडे गेल्या आहेत. तसेच पूर्वी एआयएडीएमकेच्या ताब्यात असलेल्या सात पारंपरिक जागा काँग्रेसला देण्यात आल्या असून त्या जागांवर विजय मिळवणे पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
मणिकम टागोर हे गेल्या काही काळापासून डीएमके युतीमध्ये काँग्रेसला अधिक जागा आणि सत्तेत योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका मांडत होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदाराने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर मतमोजणी ४ मे, २०२६ रोजी होणार आहे.















Discussion about this post