जळगाव | जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे केळीसह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना सरकार आणि स्थानिक मंत्री-आमदार केवळ राजकारणात मग्न असल्याची खरपूस टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात तत्काळ मदत आणि संवेदना व्यक्त होणे अपेक्षित असते, मात्र तसे होताना दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.
संजय राऊत जळगाव दौऱ्यावर असून आज शुक्रवारी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, कालच्या अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अशावेळी सरकार, पालकमंत्री किंवा आमदारांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पावले उचलणे गरजेचे होते. पंजनामे आणि मोजण्या होतील, पण त्यातून शेतकऱ्यांच्या तातडीच्या अडचणी सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या घरात हाहाकार माजला असताना सरकार अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे मंत्री शेतकऱ्यांच्या संकटाच्या वेळी कुठे आहेत, असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकारणात फक्त राजकीय संकट सोडवले जाते का, पण शेतकऱ्यांच्या संकटाकडे दुर्लक्ष केले जाते, असा टोला त्यांनी लगावला.
तसेच जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही सुरू असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला. पोलिसांच्या मदतीने विरोधकांचा आवाज दडपला जात असून वर्दीतील गुंडगिरी ही लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले. पुढील निवडणुकीत काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहितीही त्यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.















Discussion about this post