मुंबई: राज्यसभा खासदार झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्था’वर जाऊन घेतलेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत अजित पवार यांच्या संदर्भात सुरू असलेल्या कायदेशीर आणि राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होत असताना पार्थ पवार यांनी अनुभवी नेते म्हणून राज ठाकरे यांचे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी रोहित पवार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या काही मार्गदर्शक तत्त्वांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या भेटीमुळे पक्षाच्या पुढील धोरणांबाबत आणि अंतर्गत राजकारणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भेटीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी राज ठाकरे आणि पवार कुटुंबातील जुने संबंध लक्षात घेता, आगामी काळात मनसे आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात नवीन राजकीय समीकरणे किंवा संभाव्य युती घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.















Discussion about this post