पुणे । उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी यंदाचे शैक्षणिक वेळापत्रक वेगळे ठरणार आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू होणार असली, तरी यंदा सुट्टीचा कालावधी तुलनेने कमी असणार आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारी सुट्टी यंदा उशिरा म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. १ मे रोजी शालेय निकाल जाहीर झाल्यानंतरच अधिकृतपणे सुट्टी लागू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे दिवस कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदर्भासह राज्यातील सर्व विभागांतील शाळा १५ जूनपासूनच पुन्हा सुरू होणार आहेत. सर्व शाळांनी याच तारखेपासून नियमित अध्यापनास सुरुवात करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
जून महिन्यात वाढत्या तापमानाचा विचार करून विशेष उपाययोजना देखील करण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रातच भरवण्यात येणार आहेत. १५ जून ते २७ जून या कालावधीत शाळांची वेळ सकाळी ७ ते ११.४५ अशी राहणार असून, त्यानंतर शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.
यंदाच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना आपल्या सुट्टीचे आणि दैनंदिन नियोजन नव्याने करावे लागणार असल्याचे चित्र आहे.















Discussion about this post