जळगाव । अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे असलेल्या माजी सरपंचला अचानक चक्कर आली आणि यातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. शंकरराव शिरसाट असं त्यांचं नाव आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी असे रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांचे नाव न घेता सुनावले आहे. तसेच जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत. त्यांना जरा हा फोटो दाखवा ! असेही रोहिणी खडसे संतापून म्हणाल्या आहेत. त्यांनी एक्स अकाऊंटवरुन ट्वीट केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात काँग्रेस पक्षाचे आमदार आंदोलन करत असताना 25 दिवसांत गॅस सिलिंडर मिळतो, गॅस बूक करा असे विधान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केले होते. या ट्वीटमधून रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावरती नाव न घेता टीका केली.
या घटनेवर बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापायी सामान्य नागरिकांचा जीव जातोय. सरकारचा तीव्र शब्दांत मी निषेध करतो. असे ते म्हणाले आहेत.














Discussion about this post