पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मे २०२६ मध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. त्यानंतर साधारण ८ ते १० दिवसांच्या अंतराने दहावीचा निकाल प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. परंपरेप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल आधी आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निकाल जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी बोर्डाकडून अधिकृत वेळ आणि तारीख जाहीर केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन प्रसिद्ध केला जाऊ शकतो.
गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास, २०२५ मध्ये बारावीचा निकाल ५ मे रोजी, तर दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला होता. २०२४ मध्ये बारावीचा निकाल २१ मे आणि दहावीचा २७ मे रोजी लागला होता. तर २०२३ मध्ये बारावीचा निकाल २५ मे आणि दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर करण्यात आला होता.
यंदा बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान पार पडल्या आहेत. त्यामुळे परीक्षेनंतर सुमारे दोन महिन्यांत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असली तरी विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती तपासावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.















Discussion about this post