नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटरवरून 3 रुपये प्रति लिटर करण्यात आले असून डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये प्रति लिटरवरून थेट शून्य करण्यात आले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. इंधन दरवाढीचा परिणाम महागाईवर होत असल्याने हा निर्णय अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक असलेल्या नायरा एनर्जीने अलीकडेच पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ जाहीर केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून इंधन दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरू आहेत. मात्र, तणाव काही प्रमाणात कमी होण्याच्या संकेतांमुळे शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घट झाल्याचे वृत्त आहे.















Discussion about this post