जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तापमानात घसरण झाली होती. यामुळे उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता अवकाळी पावसाचे सावट संपुष्टात आले असून उन्हाची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. अवघ्या एका दिवसात तापमानात तब्बल ४ अंशांची वाढ नोंदवण्यात आली असून जळगावचा पारा थेट ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र, अवघ्या ४८ तासांत यात मोठी वाढ झाली आहे. २३ मार्च रोजी पारा ३६ अंशांवर गेला, तर आज २४ मार्च रोजी त्याने ३७.६ अंशांची वेस ओलांडली आहे. किमान तापमानातही वाढ झाली असून रात्रीचा उकाडाही जाणवू लागला आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस तापमानात सातत्याने वाढ होण्याचा अंदाज आहे. तापमान ३८ ते ४० अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत भुसावळच्या बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.















Discussion about this post