पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला बेपत्ता असल्याचे समजलेले हे प्रकरण आता हत्येचे असल्याचे समोर आले असून प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून तरुणाचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माहितीनुसार, विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री घरातून बाहेर गेल्यानंतर परत आला नव्हता. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतरही त्याचा मागमूस न लागल्याने २६ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला असता संजय परशुराम जाधव याच्यावर संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला तो समाधानकारक माहिती देत नव्हता. मात्र सखोल चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीतून असे समोर आले की, आरोपी संजय जाधव याची पत्नी सोनाली जाधव आणि विजय राठोड यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यान, विजयने सोनालीचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तिच्यावर दबाव आणल्याची माहिती संजयला मिळाली. या कारणामुळे संतप्त झालेल्या संजयने पत्नीच्या मदतीने विजयची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. गुन्हा लपविण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचेही समोर आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post