महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा कडाका वाढला आहे. विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हा परिषद शाळा सकाळी ७ ते ११.३० या वेळेत भरवण्यात येणार आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात तापमानात मोठी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात तापमान जवळपास ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून उकाड्याची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यातील इतर भागांमध्येही उष्णतेचा परिणाम जाणवू लागला आहे. परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ३८.०४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे दिसत आहे.
अकोला जिल्ह्यातही उन्हाचा कडाका वाढला असून तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी काही ठिकाणी ग्रीन नेटचे मंडप उभारण्यात आले आहेत. विशेषतः न्यू तापडियानगर परिसरातील रेल्वे क्रॉसिंगवर नागरिकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात झालेली वाढ लक्षात घेता येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.














Discussion about this post