एरंडोल । एरंडोल शहरातील लांडापुरा भिलाटी परिसरात ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या मुलीवर शेजारी राहणाऱ्या ५७ वर्षांच्या नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केला. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल शहरातील केवडीपुरा येथील एक महिला कुटुंबासह लांडापुरा भिलाटी परिसरात राहते आहे. मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास ही महिला घराजवळील शौचालयास गेली होती. त्या वेळी तिची तिन्ही मुले घरात खेळत होती. काही वेळानंतर महिला घरी परत आली असता तिची चार वर्षांची मुलगी घरात दिसून आली नाही.
त्यामुळे महिलेने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या नातेवाइकाच्या घरी जाऊन चौकशी केली असता मुलगी संशयास्पद परिस्थिती दिसून आली. त्यामुळे महिलेने तिला तात्काळ घरी आणले. त्या वेळी मुलीच्या अंगावर जखम व सूज आढळली. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारा संदर्भातील गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयिताला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. घटनेनंतर शहरातील अमळनेर नाका परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती केली.















Discussion about this post